Container hits bike, one seriously injured, another's leg broken
शहागड, पुढारी वृत्तसेवा अबंड तालुक्यातील शहागड येथे छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी नदीच्या उड्डाणपुलावर सकाळी पडलेल्या धुक्यामुळे कंटेनर चालकाला दुचाकी न दिसल्याने कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीवरील अन्य एका जणाचा पाय मोडला आहे.
जालना येथून बीडकडे दुचाकी (क्र.एम एच०५-बी सी ५६४५) वर जाणाऱ्या दिलीप बाबुलाल गायकवाड हा भांडी विकण्यासाठी ते दुचाकीवर घेऊन जात असताना शहागड येथील गोदावरी नदीवरील उड्डाणपुलावर गुजरातकडून हैदराबादकडे डिटर्जन्ट साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला सकाळी सहा वाजता पडलेल्या दाट धुक्यामुळे दुचाकीस्वार निदर्शनास आला नाही.
त्यातच पुलावरील पथदिवेही बंद असल्याने कंटेनर (क्र. टी एस०७ युई ३१७६) चालक रेवंद्र सिद्धाप्पा आण्णाप्पा मंधाल याने भरधाव वेगात निष्काळजीपणाने कंटेनर चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दिलीप गायकवाड हा गंभीर जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एन.एच. आय. रुग्णवाहिकेने त्याला प्रथम बीड व नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले.
सदरची घटना सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला ट्रकच्या खालून बाहेर काढले. शहागड पोलिस चौकीचे पोलिस जमादार रामदास केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकसह चालकास ताब्यात घेतले. ट्रक शहागड पोलिस चौकीला लावण्यात आला.
धुक्यामुळे काळजी घ्या
गोदावरी नदी परिसरात सकाळी दाट धुके पडत असल्याने वाहनचालकांनी वाहने चालविताना तसेच मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. वाहनचालकांनी वाहनांचे हेडलाईट व हॉर्न वाजवून इतर वाहनचालकांना सतर्क करावे, असे अवाहन गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडकर यांनी केले.