

जालना, पुढारी वृत्तसेवाः परतूर आणि घनसावंगी तालुक्यात सुमारे ५६४ इतके ऊसतोड कामगारांचे कुटुंब आहे. या कुटुंबांच्या शाश्वत उपजिविकेबरोबरच त्यांची मुल शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नातून ३० गावातील ऊसतोड कामगारांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
दुर्लक्षित या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या मदतीने जोरकसपणे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, संस्थेच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक पालकत्व उपक्रम परतूर आणि घनसावंगी तालुक्यात राबविण्यात येत आहे. दोन तालुक्यातील ३० गावात या उपक्रमासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्यावतीने जोरकसपणे पाऊले टाकण्यात येत आहे.
समाजातील दुर्लक्षित आणि उसतोड कामगार मुले हे हंगामी स्थलांतराचे बळी ठरतात. यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होताना दिसून येत नाही. आई वडील ऊसतोडीसाठी जाताना बालकही त्यांच्यासोबत राहतात. त्या बालकांना ऊसतोडी ठिकाणी आरोग्य, शिक्षण, पोषण या बाबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व शिक्षण विभाग जालना यांच्या मदतीने गाव पातळीवर गाव स्वयंसेवक व गाव मित्राच्या माध्यामातुन शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
ऊसतोडीसाठी गेलेल्या बालकांसाठी, आजी आजोबा कडे राहणाऱ्या बालकांसाठी विविध उपक्रम संस्थेच्या मदतीने राबविण्यात येत आहे. या क्रार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक एकनाथ राउत, गाव स्वयंसेवक राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, आकाश चौगुले, महादेव खरात, योगेश आढे आदी परिश्रम घेत आहे.