जालना

Chili crop failure | पावसाअभावी मिरचीचे पीक सुकले, डोळ्यादेखत शेतकऱ्याची स्वप्ने झाली राख

सुरुवातीला विहिरींच्या पाण्यावर उभे राहिलेले पीक आता पाणी आटल्याने अडचणीत आले आहे

पुढारी वृत्तसेवा

सादिक शेख

आन्वा : भोकरदन तालुक्यात मिरची उत्पादनात विक्रमी वाढ झालेली असतानाच यंदा पावसाळा लागून ही पावसाने दडी मारल्याने आणि विहिरींचे पाणी आटल्याने मिरचीचे पीक कोमात गेले आहे. गेल्या वीस दिवसांपासून एकही पाऊस न पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून टँकरच्या पाण्यावर पिके वाचविण्याची वेळ आली आहे.

भोकरदन तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून पाणी पातळीही झपाट्याने घटत आहे. परिणामी शिवारातील बहरलेली मिरचीची पिके डोळ्यादेखत सुकू लागली आहेत. हातचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दानापूर व सुरंगळी या ठिकाणाहून दहा किलोमीटर अंतरावरून विकत पाणी आणावे लागत आहे. ६ हजार रुपये प्रतिट्रॅकर दराने पाणी विकत घेऊन ते विहिरीत टाकून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. हा केविलवाणा खटाटोप तळपत्या उन्हात सुरू आहे. आगामी दिवसांत मृग नक्षत्र बरसले नाहीतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तालुक्यात यंदा सुमारे ७ हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व उन्हाळी मिरची लागवड झाली आहे. आन्वा, वाकडी, कुकडी, जानेफळ गायकवाड, पारध, वालसावंगी, धावडा, हिसोडा, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, आडगाव भोंबे, दहिगाव, धोंडखेडा, कोदा, जळगाव सपकाळ, सुरंगळी, कठोरा बाजार, दानापूर या गावांचा यात समावेश आहे. एप्रिलच्या अखेरीस व मेच्या सुरुवातीस लागवड पूर्ण झाली होती. सुरुवातीला विहिरींच्या पाण्यावर उभे राहिलेले पीक आता पाणी आटल्याने अडचणीत आले आहे.

बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचन यासाठी मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली. मात्र, काढणीच्या वेळी बाजारात मिरचीची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

काही भागात रोगराई व बदलत्या हवामानामुळे उत्पादनातही घट झाली आहे. एकीकडे उत्पादन कमी तर दुसरीकडे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकावर मोठ्या आशा ठेवून कर्ज काढले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
दिलीप काकडे, मिरची उत्पादक शेतकरी कारलावाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT