Brokers are making money from construction workers' schemes
जालना, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा उद्देश कामगारांचे जीवनमान उंचावणे, शिक्षण, आरोग्य, निवारा आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनांचा लाभकामगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी अनधिकृत संघटना, संस्था, एजंट व दलाल यांच्या घशात जात असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.
कामगारांना योजनेचा लाभमिळवून देण्याचे आमिष दाखवत हे दलाल मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करत आहेत. विशेष म्हणजे, या योजनांसाठी कोणताही दलाल किंवा मध्यस्थ अधिकृत नाही, तसे स्पष्ट आदेश असतानाही ग्रामीण आणि शहरी भागात दलालांचे जाळे सक्रिय झाले आहे. बहुतांश बांधकाम कामगार हे अल्पशिक्षित असल्याने तसेच ऑनलाईन प्रक्रियेची माहिती नसल्याने ते सहजपणे या दलालांच्या जाळ्यात अडकतात.
नोंदणी नूतनीकरण, लाभ मंजुरी, बँक खात्याशी जोडणी, कागदपत्र दुरुस्ती अशा प्रत्येक टप्प्यावर दलाल वेगवेगळ्या कारणांनी पैसे मागतात. याकडे गांभीयनि लक्ष देणे गरजेचे असून, अधिकृत माहिती केंद्रे, मोफत मार्गदर्शन शिबिरे आणि दलालांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.
लाभासाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. भांडीसंच वाटप, पाल्यांना शिष्यवृत्ती, वैद्यकीय सहाय्य, विवाहासाठी अनुदान, सुरक्षा किट यांसह इतर अनुदान योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट, दलालांकडून सर्रासपणे लाभार्थ्यांकडून ५० टक्के रक्कम घेतल्या जाते. मात्र, लाभार्थी देखील बिनबोभाटपणे ५० टक्के रक्कम दलालांकडे सुपूर्द करतात. यामुळे दलालांची हिंमत वाढत आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या या विविध योजनांचा लाभ विनाशुल्क घेता येतो. लाभ मिळून देण्यासाठी ज्या संघटना, संस्था, एजंट आमिष दाखवतात. त्यांच्या आमिषाला कामगारांनी बळी पडू नये. तसेच या कार्यालयामार्फत अशा कोणत्याही संघटना, संस्था, एजंटाची नियुक्ती केलेली नाही. याची खबरदारी घ्यावी.- अमोल जाधव, सरकारी कामगार अधिकारी, जालना.