Black marketing of rations stopped; 252 quintals of food grain seized!
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत दि. २ रोजी धावडा ता. भोकरदन येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे, पुरवठा निरीक्षण अधिकारी सदानंद नाईक (भोकरदन), नंदकुमार क्षीरसागर सहायक महसूल अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जालना, राहुल पल्हाटे पुरवठा निरीक्षक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जालना तसेच सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने (पारध पोलिस ठाणे) यांच्या संयुक्त पथकाने भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन आदी धान्याचा विनापरवाना साठा विविध ठिकाणी आढळून आला. पथकाने एकूण २५०.66 क्विंटल धान्य जप्त केले. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धान्य साठवणूक, खरेदी-विक्री व वाहतुकी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे, साठा नोंदवही, विक्री नोंदी व इतर अभिलेख उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
रेशनच्या अवैध साठ्याबद्दल माहिती द्या
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा अवैध साठा, काळाबाजार किंवा इतर गैरप्रकारांची माहिती मिळाल्यास ती त्वरित पुरवठा विभाग अथवा पोलिस प्रशासनास द्यावी. अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध जिल्हा प्रशासनाची कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.