Jui Dam Water Level pudhari photo
जालना

Jui Dam Water Level : जुई धरणात एक टक्का पाणीसाठा

दानापूर : भोकरदन शहरासह २५ गावांचा पाणीप्रश्न गंभीर, उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट गडद

पुढारी वृत्तसेवा

आन्वा : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील पाणीसाठा आता अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचला असून धरणात केवळ मृतजल साठा शिल्लक असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील सुमारे २५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

यंदाच्या अपुऱ्या पावसाचा परिणाम जलसाठ्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपेक्षित पाणीसाठा निर्माण न झाल्याने जुई धरणावर अवलंबून असलेल्या गावांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येऊन मृतजल साठ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.

भोकरदन शहरासह परिसरातील २५ गावांना या धरणाच्या पाणीसाठ्याचा मोठा आधार आहे. मात्र, धरणात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आणि सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आता पाण्याअभावी ग्रामीण जनजीवनावर आणखी संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. आतापासून प्रशासन व नागरिकांनी मिळून पाणी बचतीसह उपाय योजना करण्याची खरी गरज असल्याचे दिसून येत आहे.

पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करा

जुई धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. भोकरदन शहरासह २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, पर्यायी जलस्रोतांचा शोध घ्यावा तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासल्यास त्याची पूर्वतयारी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

उपाययोजना करा

एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे धरणातील संपत चाललेला पाणीसाठा यामुळे भोकरदन तालुक्यातील नागरिकांच्या नजरा आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. जुई धरणातील उरलेला पाणीसाठा किती दिवस पुरणार आणि २५ गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT