Jalna Drought pudhari photo
जालना

Jalna Drought : मजुरांच्या हाताला काम मिळेना; शेत कामे ठप्प

आन्वा : रोजगाराअभावी ग्रामीण मजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ

पुढारी वृत्तसेवा

आन्वा :भोकरदन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाली असतानाही ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम संपला, रब्बी हंगामही पुढे सरकला, मात्र शेतमजुरांना रोजगाराची संधी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पेरणी, मशागत आणि शेतीची कामे अपेक्षेप्रमाणे झाली नाहीत. त्यातच रब्बी हंगामातही शेतातील कामे मर्यादित राहिल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. गावोगावी कामाच्या शोधात फिरणाऱ्या मजुरांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुष्काळामुळे शेतकरी स्वतः आर्थिक अडचणीत असताना मजुरांना काम देण्याची परिस्थितीही अनेक ठिकाणी राहिलेली नाही. परिणामी, शेतमजुरांच्या कुटुंबांवर घरखर्च, किराणा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि इतर दैनंदिन गरजा भागविण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. काम नाही, उत्पन्न नाही आणि पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न अनेक कुटुंबांना सतावत आहे. कामे सुरू करण्याची गरज आहे.

शासनाच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाची गरज

दुष्काळी परिस्थितीत केवळ घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मजुरांच्या हाताला काम मिळणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, रोजगार हमीची कामे गावागावात सुरू करावीत आणि काम मागणाऱ्या मजुरांना वेळेत काम मिळेल यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रोजगार हमीची कामे सुरू करा

  • दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे.

  • गावांमध्ये रस्ते दुरुस्ती, जलसंधारण, नाला खोलीकरण, शेततळे, बंधारे आणि इतर सार्वजनिक कामे सुरू केल्यास स्थानिक मजुरांना रोजगार मिळू शकतो, तसेच भविष्यातील पाणीटंचाईवरही काही प्रमाणात उपाय होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT