Jalna News : आष्टीतील रस्त्यांचा वनवा मिटला; बसेसचा दुष्काळ कधी संपणार ? file photo
जालना

Jalna News : आष्टीतील रस्त्यांचा वनवा मिटला; बसेसचा दुष्काळ कधी संपणार ?

आष्टी : शेगाव-पंढरपूर, अंबड-पाथरी-सेलू मार्गावर अपुऱ्या बससेवेने प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

Ashti: Passengers suffer due to inadequate bus service on Shegaon-Pandharpur, Ambad-Pathri-Selu routes

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: परतूर तालुक्यातील आष्टी हे जालना, बीड आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेले महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव आहे. गावच्या चोहोबाजूंनी रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून शेगाव-पंढरपूर तसेच पैठण-पाथरी मार्गामुळे आष्टीचा विविध भागांशी संपर्कही वाढला आहे. मात्र, रस्त्यांचा प्रश्न काही अंशी सुटला असला तरी पुरेशा बससेवेचा प्रश्न अद्याप कायम असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. विविध मार्गावर अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच नियमित बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

आष्टी परिसरातील नागरिकांचा दररोज विविध कामानिमित्त परतूर, माजलगाव, घनसावंगी, पाथरी, सेलू, अंबड, जालना आदी ठिकाणी प्रवास सुरू असतो. या तालुक्यांपैकी अनेक ठिकाणे आष्टीपासून साधारण २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर आहेत.

त्यामुळे आष्टी बसस्थानकात सकाळपासून प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत बसफेऱ्या अत्यल्प असल्याने नागरिकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. माजलगाव मार्गावर सायंकाळनंतर बससेवेचा अभाव आष्टी-माजलगाव मार्गावर परतूर आगाराच्या परतूर-तुळजापूर आणि परतूर-पंढरपूर या दोन बसफेऱ्या सुरू आहेत.

माजलगाव आगाराकडून काही प्रमाणात शटल बससेवाही उपलब्ध आहे. मात्र, या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सायंकाळनंतर बससेवा अपुरी पडत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास येणाऱ्या तुळजापूर-परतूर बसनंतर पुढील बस उपलब्ध नसल्याने दूरवरून पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

आष्टी परिसरातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परतूर, अंबड, पाथरी आणि माजलगाव आगारांनी परस्पर समन्वय साधून बसफेऱ्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. एका आगाराच्या बसची फेरी संपल्यानंतर दुसऱ्या आगाराची बस उपलब्ध होईल, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

शटल बसची गरज

आष्टी-परतूर मार्गावरही अशीच परिस्थिती आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परतूरकडे जाणारी बस उपलब्ध असली तरी त्यानंतर आष्टीकडे येण्यासाठी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. संभाजीनगर, जालना आदी ठिकाणांहून रेल्वेने प्रवास करणारे अनेक नागरिक रात्री साडेसातनंतर परतूर येथे पोहोचतात. त्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेसनंतर परतूरहून आष्टीसाठी शटल बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पाथरी-सेलू मार्गावरही अपुऱ्या फेऱ्या

आष्टी-पाथरी-सेलू मार्गावर पाथरी आगाराची ठराविक बससेवा सुरू आहे. मात्र, परतूर आगाराची एकही बस आष्टीमार्गे या दिशेने जात नसल्याने प्रवाशांना उपलब्ध असलेल्या मर्यादित बससेवेवरच अवलंबून राहावे लागते. शासकीय कामे, शिक्षण, उपचार, व्यापार तसेच बाजारपेठेतील कामांसाठी पाथरी व सेलूकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असतानाही त्या प्रमाणात बसफेऱ्या उपलब्ध नाहीत.

अंबड मार्गावरील स्थिती अधिक गंभीर

आष्टी-अंबड मार्गावर बससेवेची स्थिती आणखी गंभीर असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अंबड आगाराच्या अंबड-परभणी आणि अंबड-आष्टी या दोन बसफेऱ्या प्रत्येकी एक-एक फेरी करतात. त्यानंतर दिवसभर आष्टीहून अंबडकडे जाण्यासाठी किंवा अंबडहून आष्टीकडे येण्यासाठी पुरेशी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT