

Water supply to Jalna city suspended for three days starting today
जालना, पुढारी वृत्तसेवा : आधीच सात ते दहा दिवसाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात जालना- जायकवाडी जलवाहिनीच्या हाती घेण्यात आलेल्या तांत्रिक कामाने खोडा घालण्याचे काम केले आहे. आज सोमवार, दि. ५ ते ७दरम्यान शहरातील पाणी पुरवठा महापालिकेच्यावतीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आवश्यक तांत्रिक कामे करण्यासाठी ५ ते ७ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. जालना शहर महानगरपालिकेमार्फत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण व अंबड येथील पंपिंग स्टेशनमध्ये विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या दोन्ही पंपिंग स्टेशनमधील जने पंप काढून जालना त्याऐवजी नवीन पंप बसविण्यात येणार आहेत. हे काम सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.
यासोबतच नवीन ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी ९०० मिमी व्यासाची शुद्ध पाण्याची वाहिनी जुन्या पंपिंग स्टेशनच्या विद्यमान २०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा वाहिनीला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे या कामासाठीही संबंधित पाणीपुरवठा वाहिनीचा शटडाऊन आवश्यक आहे.
सर्व तांत्रिक कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्याच्या उद्देशाने ५ ते 19 ऑक्टोबरदरम्यान सलग तीन दिवस शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा
शटडाऊनच्या कालावधीत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शटडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
९०० मिमी जलवाहिनी जोडण्याचे काम
यासोबतच नवीन ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी २०० मिमी व्यासाची शुद्ध पाण्याची वाहिनी जुन्या पंपिंग स्टेशनच्या विद्यमान ९०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा वाहिनीला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठीही संबंधित पाणीपुरवठा वाहिनीचा शटडाऊन आवश्यक आहे.