

Jalna News : Allegation that woman died due to doctor's negligence
अंबड, पुढारी वृत्तसेवा : शहागड येथील एका दवाखान्यात उपचार घेत असताना प्रकृती खालावलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी गेवराई व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, घाटी रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सत्यवान विठोबा रसाळ यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित प्रकरणाची गोंदी पोलीस चौकशी करत असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
तक्रारीनुसार, सीमा सत्यवान रसाळ यांना पोटदुखीचा त्रास असल्याने १४ सप्टेंबर रोजी शहागड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्रास सुरू झाल्याने २९ सप्टेंबर रोजी त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली.
त्यानंतर यवराई आणि तेथून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, घाटीत डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शहागड येथील दवाखान्यात उपचारादरम्यान निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांच्या उपचारपद्धतीची चौकशी करून दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू तपासणीचे विविध असून कागदपत्राच्या आधारे दोष निष्पन्न झाल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.