अंतरवाली सराटी येथे सोमवारी आयोजित ग्रामसभेत मूलभूत समस्‍यांवरून ग्रामस्‍थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले. pudhari photo
जालना

Antarwali Sarati Gram Sabha : अंतरवाली सराटी ग्रा.पं.च्‍या सरपंचांवर ग्रामस्‍थांचा रोष

ग्रामसभेत समस्यांचा महापूर; नागरिकांनी प्रशासनाला धरले धारेवर

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र राहिलेल्या अंतरवाली सराटी येथे सोमवारी (दि. २८) झालेल्या ग्रामसभेत चांगलीच वादळी चर्चा झाली. ग्रामस्थांनी विविध समस्यांवरून ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरत रस्ते, पाणी, नाल्या, स्वच्छता तसेच अंगणवाडीच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. सरपंचांच्‍या कारभारावर रोष व्‍यक्‍त करून गावातील विकासकामांच्या नावाखाली अनियमीतता झाल्याचा आरोप करीत संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणीही केली.

अंतरवाली सराटी येथे सोमवारी ग्रामपंचायतीच्‍या वतीने ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला सुरूवात होताच प्रभारी ग्रामसचिव प्रल्हाद पंडित यांनी प्रस्तावित विषयांचे वाचन करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची कामे, नाल्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित केले. काही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यांची कामे दर्जेदार झाले नसल्याचा आरोप केला. गेल्या तीन वर्षांत गावात अपेक्षित स्वरूपाची ठोस विकासकामे झालेली नसल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

गावातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. तसेच अंगणवाडीशी संबंधित विविध प्रश्नही ग्रामसभेत उपस्थित करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची चौकशी करून त्याचा अहवाल ग्रामस्थांसमोर ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, ग्रामस्थांकडून एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित झाल्याने ग्रामसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसभा सचिवांसमोर ग्रामस्थांनी आपल्‍या समस्या मांडल्या. ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या ग्रामसभेच्या इतिवृत्तात नोंदविण्यात आल्या असून, अनेक प्रश्न लेखी स्वरूपातही प्राप्त झाले आहेत. त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रभारी ग्रामसचिव प्रल्हाद पंडित यांनी दिली.

ग्रामसभेत जरांगेंचा उल्‍लेख नाही

दरम्‍यान सरपंच यांचे चिरंजीव हे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्‍हणून ओळखले जातात. एकीकडे ग्रामस्‍थांनी सरपंचांच्‍या कारभारावर नाराजी व्‍यक्‍त करत गावातील विविध विकासकामावरून तोफ डागली. तसेच नागरिकांना मुलभूत सुविधा देखील मिळत नसल्‍याचा आरोप केला. मराठा आरक्षण लढ्याचा गेल्‍या तीन वर्षांपासून मूक साक्षीदार म्‍हणून उभा असेला मंडप आणि स्‍टेज दोन दिवसांपूर्वी काढण्यात आले. यावरूनही उलट-सूलट चर्चा स्‍थानिक पातळीवर सुरू आहे. त्‍यामुळे या ग्रामसभेत जरांगे पाटील यांचा विषय येताो की नाही याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष होते. ग्रामसभेत वादळी चर्चा झाली असली तरी मनोज जरांगे यांचा नामोल्‍लेख करणे मात्र ग्रामस्‍थांनी टाळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT