जालना : आगामी रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमाबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू असताना, अंबड पोलिसांनी दोन धारदार खंजीरसह तीन तरुणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार, दि. 26 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान, अंबड शहरातील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हे तरुण वावरत असल्याचे समोर आले आहे. पोलिस हवालदार दत्ता ठोंबरे हे रुग्णालयात ड्युटीवर असताना त्यांना तीन संशयास्पद तरुण दुचाकीवर दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ठोंबरे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात कळवून जादा कुमक मागवली.
पोलिसांनी गुरुवार, दि. 26 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घेराव घातला असता, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या साहील शेख रईस (23), हाफीज सलाम शेख (25) आणि जावेद सिराज शेख (23, सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला, अंबड) यांना ताब्यात घेतले.
झडती घेतली असता, त्यांच्याकडे 36 सें.मी. आणि 27 सें.मी. लांबीचे दोन धारदार स्टीलचे खंजीर मिळून आले. पोलिसांनी 30 हजार रुपये किमतीची दुचाकी आणि शस्त्रे असा एकूण 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात शुक्रवार, दि. 27 रोजी भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोकॉ. बाळश्राफ, डी.बी. पथकाचे पोहेकाँ. यशवंत मुंडे, पोहेकॉ. दीपक चव्हाण, पोकॉ. अरुण मुंडे, पोना. डेहंगळ आदींनी केली. शहरात खुलेआम शस्त्र घेऊन फिरत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.