अंबड : नीट परीक्षेचा पेपर अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित न गेल्याने आलेल्या नैराश्यातून अंबड येथील एका तरुण विद्यार्थिनीने २२ जुलै रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मिस्बा खलील शेख असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिस्बाचे वडील पेशाने शिक्षक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी (मिस्बा) अशी दोन अपत्ये आहेत. नेहमीप्रमाणे कुटुंब घरात असताना, मिस्बाची आई गच्चीवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी मिस्बाने घरात गळफास घेतला. आई गच्चीवरून खाली आल्यानंतर तिला मिस्बा गळफास घेतलेल्या आणि लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
हा प्रकार पाहताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मिस्बाने वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली 'नीट' परीक्षा दिली होती. मात्र, हा पेपर तिला कठीण गेल्याने आणि तो व्यवस्थित न सुटल्याने ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.