Neet Exam Paper Leak : ‘माझा पेपर चांगला गेला होता, आता पुढे काय होणार?‘ ; नीट रद्द झाल्यामुळे विद्यार्थिनीने संपवले जीवन

लातूर येथील दयानंद कॉलेजमधून दिली होती निटची परीक्षा
Neet Exam Paper Leak
प्रातिनिधीक छायचित्र
Published on
Updated on

लातूर : वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून आणि मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गातेगाव येथील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मैथिली अशोक सोनवणे असे या मृत तरुणीचे नाव आहे.?

मिळालेल्या माहितीनुसार, मैथिलीने यावर्षी लातूर येथील दयानंद कॉलेजमधून नीटची परीक्षा दिली होती. तिचा अभ्यास चांगला झाला होता आणि तिला डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, नीट परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर शासनाने ही परीक्षा रद्द केली होती. परीक्षा रद्द झाल्यापासून मैथिली मानसिक तणावाखाली होती. माझा पेपर चांगला गेला होता, आता पुढे काय होणार? या विचाराने ती सतत चिंतेत असायची, असे तिच्या वडिलांनी पोलीस जवाबात म्हटले आहे.

१६ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास मैथिली घरून शेतात गेली होती. बराच वेळ ती न दिसल्याने तिची बहीण हर्षदा तिला पाहण्यासाठी शेतात गेली असता, मैथिलीने लिंबाच्या झाडाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी तिला तातडीने मुरुड येथील सरकारी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मैथिलीचे वडील अशोक विठ्ठल सोनवणे हे गातेगाव येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. मैथिली अभ्यासात हुशार होती, तिने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत ५१.५० टक्के गुण मिळवले होते. आपली मोठी बहीण इंजिनिअर असल्याने आपणही डॉक्टर व्हावे, असे तिचे स्वप्न होते. मात्र, परीक्षेच्या अनिश्चिततेने एका होतकरू मुलीचा बळी घेतला आहे.याप्रकरणी गातेगाव पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून, वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार कोणावरही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news