जालना ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त बुधवारी सकाळी समजताच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमधे प्रचंड खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनामुळे जवळचा माणूस गेल्याच्या भावना राजकीय नेत्यांकडून ऐकावयास मिळाल्या.
अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही धक्का बसल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीनिमित्त अजित पवार यांनी जालना व परतूर येथे भेटी दिल्या होत्या. जालना जिल्ह्यात या त्यांच्या शेवटच्या भेटी ठरल्या.
जालना जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुकीत जालना व परतूर येथे भेटी दिल्या होत्या.या भेटीत त्यांनी राकाँ कार्यकर्ते व पक्षाची नव्याने बांधणी केली. जालना शहरातील नियोजन भवनास काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती. यावेळी नियोजन भवनाची पाहणी करताना पवार यांनी कामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्याजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
कामाचा संथ वेग, नियोजनाचा अभाव, दर्जात्मक कामातील त्रुटी याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. जालना जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली आहे.अजित पवार यांच्या वक्तशीरपणा हा त्यांच्या कार्यक्रमातून नेहमीच दिसत होता.वेळेचा बंधन पाळणाऱ्या या नेत्याने अचानक एक्झीट घेतल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले.
70 लाखांच्या रॉयल्टीची नोटीस केली रद्द
जालना शहरात घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्यावतीने शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातून गाळ काढून तलावाचे खोलीकरण करून पाणीसाठवणुकीचे काम करण्यात येत होते. यावेळी तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला होता.या कामादरम्यान जलसंरक्षण मंचला शासनाच्यावतीने गाळ उपसा केल्याबद्दल 70 लाख रुपये रॉयल्टी भरण्याची नोटीस देण्यात आली होती. नोटीस आल्यानंतर सदस्यांनी बदनापुरचे तात्कालीन आ.संतोष सांबरे यांना याबाबत माहिती दिली.सांबरे यांनी तात्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना लोकवर्गणीतून होणाऱ्या या कामाची माहिती देत गाळ शेतकऱ्यांना मोफत वाटल्याचे सांगितल्यानंतर अजित पवार यांनी 70 लाखांची ती रॉयल्टी भरण्याची नोटीस रद्द केली.
कर्तृत्ववान नेतृत्व हरपले - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. एका क्षणात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक प्रभावी, अनुभवी आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपल्यातून निघून गेले.अजित पवार हे प्रशासन, विकास आणि जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेते होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे राज्याच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही हानी दीर्घकाळ जाणवत राहील.डॉ. कल्याण काळे, खासदार
अजित पवार यांचे काम दिशादर्शक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच अश्रू अनावर झाले. हे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता आपल्यातून गेला. सिंचन व बांधकामसह इतर क्षेत्रांत त्यांचे काम दिशादर्शक आहे. अजित पवार हे विकासाचा चेहरा होते. त्यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आमदार अर्जुनराव खोतकर, जालना
विकासप्रिय नेता गमावला - महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तबगार व विकासशील नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री
दुःखाचा डोंगर कोसळल्याची अवस्था- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःखाचा डोंगर राकाँ पक्षावर कोसळला आहे. त्यांच्या सांगता येणार नाही एवढ्या आठवणी आहेत. जालना जिल्ह्यातील विकासकामांसाठी ते कायम सकारात्मक भूमिका घेत असत. त्यांच्याबद्दल बोलताना शब्द अपुरे पडत आहेत.अरविंद चव्हाण, राकाँ जिल्हाध्यक्ष
शिस्तप्रिय नेता गमावला- महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय विकासप्रिय नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना त्यांनी मोठे केले.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील जनतेवर संकट कोसळले आहे.कैलाश गोरंट्याल, माजी आमदार
शब्दाला जागणारा नेता - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशय स्पष्ट भूमिका घेणारे आणि दिलेल्या शब्दाला जागणारे नेते म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ख्याती होती. कामानिमित्त भेटीचा योग आला होता.आ.राजेश राठोड
वेळेचे बंधन पाळणारा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात न भरून येणारी हानी झाली आहे. गेल्या वर्षभरात मी त्यांच्या सहवासात आलो. शिस्तप्रिय व वेळेचे बंधन पाळणारा विकासप्रिय नेता असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने पोरके झाल्याची भावना आहे.सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार परतूर
कर्तबगार नेता गमावला - अजितदादांचे अपघाती निधन ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तबगार, संवेदनशील आणि समाजहिताची जाण असलेला नेता गमावला आहे. मला अजितदादांच्या सहवासात दीर्घकाळ प्रत्यक्ष काम करण्याची संधी लाभली होती. त्यांना मी अगदी जवळून पाहिले आहे.रचनात्मक कार्य, रोखठोक व स्पष्ट भूमिका, सतत लोकहिताचा ध्यास, शिस्तप्रिय वृत्ती आणि लोकजीवनाशी एकरूप होऊन लोकांसाठी अविरत काम करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होते. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत ते सतत कार्यरत असत. लोकांच्या लहानमोठ्या प्रश्नांपासून ते शिक्षण, सहकार, शेती आदी क्षेत्रांतील संस्था व संघटना उभारण्यापर्यंत त्यांनी अत्यंत सक्षम नेतृत्व दिले. या संस्था संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीने त्यांनी चालविल्या.राजेश टोपे, माजी मंत्री