आधारसाठी भटकंती संपली; तहसीलदारांनी निराधाराचा सोडवला प्रश्न pudhari photo
जालना

Aadhaar card issue : आधारसाठी भटकंती संपली; तहसीलदारांनी निराधाराचा सोडवला प्रश्न

तहसीलदारांच्या हस्तक्षेपामुळे अनेक दिवसांपासून अडकलेले आधार कार्ड अखेर तयार

पुढारी वृत्तसेवा

अविनाश घोगरे

घनसावंगी ः घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील गरीब व कष्टकरी नागरिक रामकिसन नामदेव उनवणे हे आधार कार्ड काढण्यासाठी अनेक दिवसांपासून अडचणीत सापडले होते. आधार कार्ड निघत नसल्यामुळे शासकीय योजना, बँकेची कामे तसेच इतर आवश्यक व्यवहार करताना त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

बोटांचे ठसे मशीनला लागत नसल्याने प्रत्येक वेळी “उद्या या, परवा या” असे सांगितले जात होते. त्यामुळे उनवणे यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. या परिस्थितीमुळे हैराण झालेल्या उनवणे यांनी अखेर रमेश पागोटे, तहसीलदार, घनसावंगी यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

आपली समस्या सांगितल्यानंतर तहसीलदारांनी ती अत्यंत आपुलकीने ऐकून घेतली. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी स्वतः लक्ष घातले.

तहसीलदारांच्या या हस्तक्षेपामुळे अनेक दिवसांपासून अडकलेले आधार कार्ड अखेर तयार झाले. आधार कार्ड हातात पडताच रामकिसन उनवणे यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मशीनला माझे बोट धरत नव्हते म्हणून आधार कार्ड निघत नव्हते. साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून माझे काम करून दिले. माझ्यासारख्या गोरगरिबाचे काम झाले, याचा खूप आनंद वाटतो.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि माणुसकीने हाताळाव्यात, अशी अपेक्षा पुन्हा अधोरेखित झाली आहे. तहसीलदारांच्या लोकाभिमुख भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अधिकारी असावा तर असा अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT