A triple accident involving a truck, a tractor and a motorcycle
अंबड पुढारी वृत्तसेवा: अंबड-पाचोड रोडवरील म्हाडा कॉलनी जवळ शुक्रवार (३०) रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रक, ट्रॅक्टर व रोडच्या बाजूला उभी असलेली दुचाकी यांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.
अंबड-पाचोड रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी जवळ उस वाहतुकीने भरलेला ट्रक (क्र. एम एच ०४-सी यु ७८८०) हा तीर्थपुरी येथून कडच्या दिशेने बारामती साखर कारखान्याला ऊस घेउन जात होता.
यावेळी डबल ट्रॉली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. एम एच १६ एच ७९९१) मधुन अंबड तालुक्यातील भिवंडी बोडखा येथून समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुश नगर येथे विरुद्ध दिशेने येत असताना ट्रकने डबल ट्रॉलीच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीला धडक दिली.
अपघातानंतर ट्रॅक्टरच्या दोन्हीही ट्रॉली उलटुन त्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुचाकीवर पडल्याने दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातात ट्रकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालक शेख जमील (४०) याच्या पायाला मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला.
सदर घटनेची अंबड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कुटे व अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली. जखमी ट्रक चालक जमीन शेख यासअंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधी उपचारासाठी दाखल केले.
ट्रक व दुचाकीचे मोठे नुकसान
या अपघातात ट्रक व मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅक्टर चालक कृष्णा गोरख जाधव (रा. जो-गेश्वर वाडी तालुका अंबड) हा अपघातात थोडक्यात बचावला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.c