A solar project is being set up by the Jalna Municipal Corporation at Ghanewadi, close to the city.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महापालिकेच्या वतीने शहरापासून जवळ असलेल्या घाणेवाडी येथे सोलार प्रकल्प उभारला जात आहे. ८ मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली.
जालना शहरवासीयांना घाणेवाडी येथून पाणी घ्यावे लागते, शहरात मोठ्या प्रमाणात पथदिवे, अशा प्रकारे महापालिकेचा बिलावर ४० ते ५० कोटींचा खर्च होतो. यामुळे महानगरपालिकेचा हा खर्च वाचावा, या उद्देशाने घाणेवाडी परिसरात सोलार प्रकल्प होत आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ८ तर दुसऱ्या टप्प्यात ८ असा १६ मेगावॅटचा प्रकल्प होत आहे.
दरम्यान, आता ८ मेगावॅट प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या ठिकाणची वीज ही नागेवाडी येथील उपकेंद्रावर साठविली जाणार आहे. जालना शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी शिवारातील ७० एकर जागेवर हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे. यातून १५ मेगावॉट वीजनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.
ही वीज महानगरपालिका वापरणार आहे. जालना शहरात पथदिवे, जायकवाडी, घाणेवाडीतून येणारा पाणी पुरवठा यामुळे दैनंदिन मोठ्या प्रमाणात वीज बिल लागते. या वीज बिलाची बचत होण्यासाठी मदत होणार आहे. घाणेवाडी तलावाच्या परिसरात सोलार प्लेटा मोठ्या प्रमाणात लागणार आहेत.
राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात होणारा हा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे. असेच प्रकल्प आता राज्यातील इतर पालिकादेखील सुरू करणार आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर जवळपास ५० कोटींची महापालिकेची बचत होणार आहे. यातून नागरी समस्यांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. संतोष खांडेकर, आयुक्त, महापालिका, जालना.