Bhokardan school bus pudhari photo
जालना

Bhokardan school bus : बसअभावी ८० विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित

अहिल्याबाई होळकर (मानव विकास मिशन) योजनेंतर्गत बस सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील तादुंळवाडी येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुंठाड, जैनपूर, कोठारा व परिसरातील ८० विद्यार्थिनींना अद्यापही मोफत बससेवा उपलब्ध न झाल्याने पावसाळ्यात शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष घालून अहिल्याबाई होळकर (मानव विकास मिशन) योजनेंतर्गत बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.

२४ जून २०२६ रोजी श्री छत्रपती संभाजी विद्यालय, तादुळवाडीच्या मुख्याध्यापकांनी जाफ्राबाद आगार व्यवस्थापक तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भोकरदन यांच्याकडे विद्यार्थिनींसाठी मोफत बससेवा सुरू करण्याबाबत लेखी प्रस्ताव सादर केला होता.

यानंतर २ जुलै २०२६ रोजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भोकरदन यांनी संबंधित प्रस्तावाची दखल घेत जाफ्राबाद आगार प्रमुखांना अधिकृत पत्र पाठवून अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी मोफत बसची व्यवस्था करण्याची शिफारस केली. या पत्रानंतर जाफ्राबाद आगाराच्या अधिकाऱ्यांनी मुंठाड–जैनपूर–कोठारा–तादुळवाडी या मार्गाचा प्रत्यक्ष सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणामध्ये या मार्गावर बस सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा सकारात्मक अहवाल देण्यात आल्याचे समजते. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही आजपर्यंत बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील चिखल, पाण्याचे प्रवाह आणि वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे मुंठाड, जैनपूर आणि कोठारा येथील अनेक विद्यार्थिनी नियमितपणे विद्यालयात पोहोचू शकत नाहीत.

काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पायी किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, अनेकदा त्यांना शाळा बुडवावी लागत आहे. परिणामी त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून शैक्षणिक नुकसान वाढत आहे.

  • ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने मोफत बससेवेची संकल्पना राबविली आहे. मात्र, सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष बस सुरू होत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची उपस्थिती वाढेल, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल आणि पालकांवरील आर्थिक भारही हलका होईल. विद्यालयाचे शिक्षकांनीही प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

  • सर्वेक्षण पूर्ण होऊन बस सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही अद्याप बससेवा सुरू का करण्यात आली नाही? असा सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने यापुढे विलंब न करता बससेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT