7,982 beneficiaries receive benefits of government schemes
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी (दि. १) नृसिंह मंगल कार्यालय येथे आयोजित जनता दरबार व महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ ७ हजार ९८२ लाभार्थ्यांना देण्यात आला.
नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात आणि प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण व्हावे, या उद्देशाने घनसावंगी येथे हे शिबिर घेण्यात आले. यावेळी आमदार हिकमत उढाण यांनी महसूल, कृषी, पंचायत राज, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, संजय गांधी निराधार योजना आदी विभागांच्या स्टॉलना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
नागरिकांशी संवाद साधून त्यांनी विविध अर्ज, तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या. प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जावर गांभीर्याने कार्यवाही करून १५ दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मार्गदर्शन करताना आमदार उढाण म्हणाले, "शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच महायुती सरकारचे प्रमुख ध्येय आहे." शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. माहितीअभावी एकही लाभार्थी वंचित राहू नये. महसूल अभियानामुळे अनेक विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पणही पार पडले. कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थितीत होते.
३० स्टॉलची उभारणी
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत राज, समाजकल्याण, महिला व बालविकास, शिक्षण, पशुसंवर्धन, जलसंधारण, अन्न व नागरी पुरवठा, महावितरण आदी ३० शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योजनांची माहिती देत अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि अनेक समस्यांचे जागेवरच निराकरण केले.