

Technical glitch in the rain gauge at Hasnabad?
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः हसनाबाद महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्रात पावसाची अत्यंत चुकीची नोंद होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ३० जुलै ते ३१ जुलै दरम्यान परिसरात रिमझिम पाऊस झालेला असतानाही, पर्जन्यमापक यंत्रात तब्बल १५५ मि.मी. (अतिवृष्टी) पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या यंत्राची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी तक्रार हसनाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासकीय रेकॉर्डवर १५५ मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे शासनाच्या विविध योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. यामुळे पीक विमा, दुष्काळ जाहीर होणे, पीक कर्ज सवलत, नैसर्गिक आपत्ती मदत आणि DCS MH पीक सर्वेक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत हसनाबाद मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासनाने हसनाबाद येथील पर्जन्यमापक यंत्राची तज्ज्ञांकडून त्वरित तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी, १५५ मिमी पावसाची नोंद रद्द करून प्रत्यक्ष परिस्थितीनुसार योग्य नोंद शासनाच्या रेकॉर्डवर घेण्यात यावी. पर्जन्यमापक केंद्राला कुलूप लावून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी भोकरदन तहसील आणि कृषी विभागाने त्वरित दखल घेऊन हसनाबाद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ओढे-नाले कोरडे, पण कागदावर अतिवृष्टी !
हसनाबाद व परिसरात गुरुवारी (३० जुलै) सकाळपासून शुक्रवारी (३१ जुलै) दुपारी ४ वाजेपर्यंत केवळ रिमझिम पाऊस पडला. परिसरातील कोणत्याही शेतात पाणी साचले नाही, तसेच ओढे, नाले किंवा नदीला पूर आलेला नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आणि प्रसारमाध्यमांमध्ये हसनाबाद मंडळात १५५ मिमी पाऊस झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रत्यक्षातील परिस्थिती आणि शासकीय नोंदी यातील या प्रचंड तफावतीमुळे शेतकरी अवाक झाले आहेत.