Graduate Constituency Election : जालन्यात ५९.८१ टक्के मतदान file photo
जालना

Graduate Constituency Election : जालन्यात ५९.८१ टक्के मतदान

तळणीत मतदारांनी फिरवली पाठ ५६.६, तर आष्टीत ७०.८३ टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

59.81 percent voter turnout in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवाः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज शुक्रवार, दि.२३ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ८९ मतदान केंद्रावर मतदान झाले. यात दुपारी २ वाजे पर्यंत ३८.०१ इतके तर ४ वाजेपर्यंत ५९.८१ इतके मतदान झाले. पदवीधरांनी सकाळी मतदान करण्यासाठी जालना शहरातील विविध मतदान केंद्रावर गर्दी केली होती.

जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालय, चरण पहेलवान (सी.पी.) भक्त महाविद्यालय येथील मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन मतदान प्रक्रिया योग्य पध्दतीने होत असल्याची पाहणी केली. सर्वाधिक मतदान परतूर तालुक्यातील आठ केंद्रावर सरासरी ७० टक्के तर सर्वात कमी मतदान मंठा तालुक्यात पाच केंद्रावर ५५.९३ टक्के इतके मतदान झाले. जिल्ह्यात एकूण पुरुषांच्या मतदानाची सरासरी टक्केवारी ६३.२८ तर महिलांची ४५.४६ टक्के मतदान.

भोकरदनमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

भोकरदनः शहरासह तालुक्यात पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. शिपोरा बाजार व पिंपळगाव रेणुकाई येथील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक तेगबिरसिह संधू यांनी भेटी दिल्या. शहरातील जिल्हा परिषद प्रशाला नवे भोकरदन येथील मतदान केंद्रावर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व निर्मला रावसाहेब दानवे यांनी दुचाकीवर जाऊन आपले मतदान केले तर याच मतदान केंद्रावर आमदार संतोष दानवे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

तळणीत मतदानाचा आकडा ५६.६ टक्क्यांवर

तळणी : पदवीधर आणि सुशिक्षित मतदारांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळणी येथील मतदान केंद्र क्रमांक २८० वर यंदा मतदारांनी अनास्था दाखवल्याचे चित्र समोर आले आहे. या केंद्रावर एकूण ३०५ मतदार असताना, त्यापैकी केवळ १७१ मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या भागात मतदानाची टक्केवारी घसरून ५६.६ वर स्थिरावली आहे. एकूण पडलेल्या १७१ मतांमध्ये १५४ पुरुष मतदारांनी मतदान केले, तर केवळ १७ महिला मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्या.

आष्टीत ७०.८३ टक्के मतदान

आष्टीः येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील मतदान केंद्रावर ४३२ पैकी ३०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद शाळा भाग क्र २७३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी सात वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी चार वाजेपर्यंत चालली. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

वडीगोद्री येथे मतदानाचा टक्का वाढला

वडीगोद्री : वडीगोद्री येथे एकूण ७० टक्के मतदान झाले आहे. या मतदानामध्ये पदवीधारक मतदारा मध्ये खूप मोठा उत्साह होता. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मतदान करण्यासाठी तब्बल दोन तास वेळ लागत असल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली. वडीगोद्री येथे बूथ क्रमांक २९१ मध्ये ५५८ मतदारांपैकी ३८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३३६ पुरुषांनी व ५३ महिलांनी मतदान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT