Electricity Workers Strike : ५०० वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर  File Photo
जालना

Electricity Workers Strike : ५०० वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर

महावितरणच्यावतीने वीज सुरळीत राहणार असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

500 electricity workers on three-day strike

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील सात वीज कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर असा तीन दिवस संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ५०० च्यावर कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

वीज कर्मचारी संघटनांच्या संपाच्या पहिल्या दिवशी वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. दरम्यान वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरविण्यात आल्याचा दावा महावितरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरेंटो इत्यादी खासगी भांडवलदाराने वीज वितरणचे मागितलेले परवाने देण्यास विरोध, महावितरण कंपनीत पुनर्रचना, कामगार कपात, ३२९ विद्युत उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे ४ जलविद्युत केंद्राचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी २०० कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, पारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, लाईन स्टॉप व इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास निश्चित करणे यासह इतर मागण्यांसाठी सात कर्मचारी संघटनांच्यावतीने गुरुवार (९) पासून संप पुकारण्यात आला आहे. गुरुवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी मस्तगड भागातील कार्यालयासमोर निदर्शन केली. संपात पाचशेच्यावर कर्मचारी सहभागी दावा संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. ८) पूर्ण करण्यात आले. यानुसार जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

टोल क्रमांकावर संपर्क करा

संपकाळात नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर रात्रंदिवस सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात महावितरणच्या सात संघटनांनी सुरू केलेल्या तीन दिवसीय संपामुळे वीज पुरवठ्यवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महावितरणच्यावतीने पर्यायी उपाययोजनांचा दावा केला जात असला तरी साशंकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT