26 Talathis were found guilty in the grant inquiry
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्हयात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषी आढळलेल्या दहा तलाठ्यांवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केल्यानंतर चौकशीत दोषी आढळलेल्या इतर तलाठ्यांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
जालना जिल्हयातील अंबड व घनसावंगी या दोन तालुक्यात अनुदान घोटाळ्याची चौकशी पुर्ण करण्यत आली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ८७ तलाठ्यांना खुलासे करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ७१ तलाठ्यांनी खुलासे दिले होते. त्यात २६ तलाठी दोषी अस ल्याचे आढळुन आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दहा तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.
अनुदान घोटाळ्यात अंबड, घनसावंगी या दोन तालुक्यातील अनुदान वाटपातील संशयास्पद रक्कम सुरुवातीला ५६ कोटींवर होती. नंतर यात वाढ होऊन ती रक्कम ८० कोटी पर्यंत गेली होती. दरम्यान, चौकशी समितीने यामध्ये तपशीलवार तपासणी केली आहे. यामध्ये तलाठ्यांनी तसेच संबंधीत यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी आवश्यक पुरावे, कागदपत्रे सादर केल्यानंतर ८० कोटींच्या रकमेची संशयास्पद तफावत कमी झाली होती तपासणी अंती गैरव्याहराची रक्कम ३५ कोटीवर आली होती.
अंबड, घनसावंगी तालुक्यात अनुदानात घोटाळा उघडकीस आल्यानंतर आणि ३५ कोटींचा अपहार निष्पन्न झाल्यानंतर तलाठ्यांनी सर्वाधिक रक्कमेचा अपहार केल्याचे समोर आले होते.
काही तलाठ्यांनी तर १ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा डल्ला मारल्याचे समोर आले आहे. दोन्ही तालुक्यात २६ तलाठ्यांच्या यात समावेश असल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दहा तलाठ्यांचे निलंबन केले होते. या घोटाळ्यात काही वरिष्ठांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
नुदान घोटाळ्यात सोमवारी दोषी आढळलेल्या उर्वरीत तलाठ्यांचे निलंबन होणार असल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांनी दिली. शनिवारी पालकमंत्र्याच्या दौऱ्यामुळे तलाठ्यांवरील निलंबनाची कारवाई लांबल्याची माहीतीही सुत्रांनी दिली आहे.