

Two children die after drowning in canal water
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा :
जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले येथील दोन अल्पवयीन मुलांचा कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गावाजवळ शनिवारी (दि.१४) घडली.
देऊळगाव उगले शिवारातील जुने सरकारी कालव्यात पावसामुळे पाणी तुंबल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही मुले खेळत असताना ती पाण्यात बुडाली. कुणाल राहुल खरात (१०) व युवराज गौतम खरात (९) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे जण शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान आई-वडिलांसोबत शेतात गेले होते.
अचानक ते गायब झाल्याने आई-वडिलांनी सायंकाळी पाच वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. आठ वाजेच्या सुमारास कालव्याच्या पाण्याजवळ त्यांच्या चपला आणि कपडे निदर्शनास आले.
गावातील लोकांनी कालव्यातील पाण्यात दोन्ही मुलांचा शोध घेऊन त्यांना कालव्याबाहेर काढले. दोन्ही मुलांना सरकारी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बालकांवर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास एच. सी. जायभाये करीत आहेत.