Money Pudhari
जालना

Jalna News : दुर्दैवी घटनेनंतर बळीराजाच्या कुटुंबांना मोठा आधार

मुंडे सानुग्रह योजनेतून १२७ वारसदारांना २.५३ कोटी मंजूर !

पुढारी वृत्तसेवा

₹2.53 Crore Sanctioned to 127 Beneficiaries Under the Munde Sanugraha Yojana!

जालना, पुढारी वृत्तसेवा : शेती कामात राबताना अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या राज्यातील १२७ कष्टकरी शेतकऱ्यांच्या वारसदारांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी एकूण २ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

शेतकरी हा शेतात राबताना वीज पडणे, सर्पदंश, विहिरीत पडून मृत्यू किंवा रस्ते अपघातासारख्या अनपेक्षित संकटांना सामोरे जात असतो. अशा वेळी घरातील कर्ता पुरुष गेल्यास संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. या कुटुंबांना सावरण्यासाठी शासनाने दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ही विमा संरक्षण सानुग्रह योजना सुरू केली आहे. ताज्या निर्णयानुसार, प्रलंबित असलेल्या १२७ प्रकरणांना आता मंजुरी मिळाली असून, निधी वितरणाचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये, तर अपघातात दोन अवयव किंवा दोन डोळे निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २ लाख रुपये दिले जातात. तसेच एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते. मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे.

गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी कृषी विभागाने वेगाने पावले उचलली होती. जिल्हास् तरावरून आलेल्या छाननी अहवालानंतर हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयामुळे शासनाचे शेतकरी केंद्रबिंदू धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT