बदनापूर : बदनापूर पोलिसांनी गेवराई बाजार परिसरात केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेण्यात येत असलेली 23 गोवंश जनावरे पकडण्यात आली. या प्रकरणी जालना येथील पाच संशयितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बदनापूरचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना खबऱ्याने माहिती दिली की गेवराई बाजार भागात काही व्यापारी मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे कत्तलीसाठी जमा करत नेत आहेत. या माहितीवरून पोलिस निरीक्षकांनी तातडीने एक पथक तयार केले. यात स्वत: पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सपोनि अविनाश राठोड , पोलिस कर्मचारी शेख, गोलवाल, कराड, पठाण, ढगे आणि चालक कुंटे यांनी गेवराई येथील बाजार तळ परिसरात धाड टाकली.
यावेळी पोलिसांना पाहून काही व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र बाजारातील शेडमध्ये 115 गोवंश आढळून आले. त्यापैकी गोवंश जातीची 23 जनावरे चारा पाण्याविना, अत्यंत निर्दयपणे आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनास्थळी बाजार तळाचे ठेकेदार वसी अली झेदी यांनी उपस्थित होंते. यावेळी 92 जनावरांचे वैध दाखले सादर करण्यात आल्याने, ज्यांची पंचांसमोर तपासणी करून ती जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
मात्र उर्वरित 23 जनावरांबाबत कोणतेही दाखले किंवा मालकीचा पुरावा उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी पंचनामा करून ती ताब्यात घेतली. या कारवाईत 3 लाख 49 हजार रुपये किमतीचे 23 जनावरे पकडण्यात आले.
ही सर्व जनावरे अन्न-पाण्याविना, कठोर परिस्थितीत व निष्काळजी अवस्थेत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ती कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा स्पष्ट संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या बाबत सहायक फौजदार बाबासाहेब साहेबराव जऱ्हाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बदनापूर पोलिसांच्या कारवाईमुळे गैरकायदेशीर जनावरांची तस्करी रोखण्यात यश आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले असून पुढेही अशी कारवाई सुरूच राहील असे पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी सांगितले.