

जालना : तालुक्यातील सिंदखेड पोखरी येथून जालना येथे दवाखान्यात उपचारासाठी दुचाकीवर येणाऱ्या महिलेवर मध्येच काळाने घाला घातला. जालना - देऊळगाव राजा मार्गावरील जामवाडी शिवारातील टोलनाक्यावर पाठीमागून येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले. ही घटना शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेची अधिक माहिती अशी, की सिंदखेड पोखरी येथील आनंद रमेश तायडे (वय 38) हे आपल्या मोटारसायकल वरून आपली बहिण ज्योती ऊर्फ कांता मच्छिंद्र घायतडक (वय 40) व आपला मुलगा प्रियांश आनंद तायडे (वय 7 ) यांना घेवून जालना शहराकडे येत होता.
यावेळी जामवाडी तलाव जवळील टोल नाक्यावर आनंदची दुचाकी तृतीयपंथीयांनी पैशे मागण्यासाठी अडवली. ते काही वेळ थांबले असता त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या आयशरने (क्रमांक एमएच 28- एबीबी 8285) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ज्योती घायतडक या आशरच्या समोरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच अंत झाला. तर आनंद यांच्या पायाला जबर मार लागल्याने तेही गंभी जखमी झाले.
गंभीर जखमी आनंद तायडे यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मयत ज्योती ऊर्फ कांता घायतडक यांच्या पार्थिव देहावर याच दिवशी शुक्रवार दि.12 रोजी सिंदखेड पोखरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे.
भरधाव आयशरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रियांश दैव बलवत्तर म्हणून वाचला. या अपघातात त्याची आत्या ज्योती ऊर्फ कांत घायतडक जागीच गतप्राण झाल्या. प्रियांशच्या अंगाला साधे खरचटलेही नाही.