185 'Laal Pari' planned from Jalna for 'Ashadhi Wari'
जालना, पुढारी वृत्तसेवा
'आषाढी वारी'ला विठ्ठल दर्शनासाठी जालन्यातील चार आगारांतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी संख्या असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जालना विभागाने तयारी सुरू झाली असून, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, जालन्यातून १८५ बसेस पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.
दरवर्षी जालना जिल्ह्यासह विदर्भातील अनेक वारकरी व भाविक पंढरपूरला जाण्यासाठी जालन्यात येतात. जालना तालुका व शहरातून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी असते. गेल्या काही वर्षापासून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जालना विभागातील ४ आगारांतून पंढरपूरसाठी एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे काही दिवस अगोदर बसेस सोडण्यात येतात. त्यासाठी एसटीच्या जालना विभागाने १८५ बसेस सोडण्याची तयारी सुरू झाली आहे.
त्यात जालना विभागातुन १२५ तर जवळपास ६० बसेस जळगाव आगाराकडुन मागविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला एसटी महामंडळाच्या बसने जाणान्या वारकऱ्यांना एसटी बसची कमतरता भासणार नसल्याचा अंदाज आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील बसेसच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जालना बसस्थानकात पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी दरवर्षी समाजसेवी संस्थाकडून चहा पाणी व फराळाची व्यवस्था केली जाते.
आषाढीला भाविकांची वाढती संख्या पाहता यंदा बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जालना विभागातून १२५ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे भाविकांची सोय होणार आहे.
वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे