मराठवाडा

जालना : मराठा महासंघातर्फे सामाजिक जनजागृती अभियान

मोहन कारंडे

जालना; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 'सामाजिक जनजागृती अभियान' हाती घेण्यात आले आहे. शहरात येणार्‍या रस्त्यावरील भिंती, शासकीय कार्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणांवरील भिंतीवर घोषवाक्य लिहून जनजागृती केली जात आहे. हे अभियान जिल्ह्यात लक्षवेधी ठरत असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी सांगितले.

यावेळी देशमुख म्हणाले की, नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर सुरू झाली असून, जालना जिल्ह्यातही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठिकठीकाणी भिंती रंगवून घोषवाक्य लिहिण्याचे काम करत आहेत. गर्दीची ठिकाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, जिल्हा रुग्णालय, मंगल कार्यालय, स्मशानभूमी या ठिकाणांवरील भिंतींवर घोषवाक्य लिहून जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत सोन्यासारखी जमीन मातीमोलाने विकुन मातीमोल होऊ नका, जमीन विक्रीची घातक दिशा-करेल समाजाची दशा, नको नुसत्याच यात्रा आणि जत्रा व्यवहारात दक्ष राहा मित्रा, नाही जन्मली मुलगी तर उद्याच्या जगाला आई मिळणार कुठली, मुला मुलीच्या लग्नात खर्च करा जपून, नुसतीच एमपीएससी नाही एकमेव संधी- इतर क्षेत्रातही आहेत भरपूर संधी, महासंघाचे सभासद व्हा – भगव्याचे शिलेदार व्हा, खात्री असेल तरच राजकारणात पडा; पण उद्योग-धंद्यात मात्र नक्की पडा, असे भिंतीवर घोषवाक्य लिहिली जात आहेत.

तसेच सोशल मीडियाचा होत असलेला गैरवापर, लग्नसोहळ्यातील अवाढव्य खर्च आदी ज्वलंत आणि सर्वसमावेशक मुद्यांना हात घालून घोषवाक्यच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या अभियानात जिल्हा सरचिटणीस संतोष कर्‍हाळे, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष अशोक पडूळ, युवा अध्यक्ष ऍड. शैलेश देशमुख, कामगार आघाडीचे अध्यक्ष मंगेश मोरे, श्रीकृष्ण यादव, ऍड. लक्ष्मण उढान, प्रवीण पाचफुले आकाश जगताप, बाळासाहेब देशमुख आदी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT