जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील कुंभारी पाटी ते बेलोरा या गावाजवळ ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान दुचाकी व ट्रॅक्टरचा अपघात झाला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती गजानन आढाव व ट्रॅक्टर चालक योगेश मोरे या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील वीज वितरण कंपनीत लिपिक असलेल्या गजानन आढाव याची सिल्लोड तहसील कार्यालयात कविता साखळे हिच्यासोबत तिसरा विवाह झाला होता. कविता यांचा हा दुसरा विवाह होता. गेल्या काही दिवसांपासून कविता आणि गजानन यांच्यात वाद होत होता. कविता कोणाशी तरी फोनवर बोलते, असा संशय पती गजाननला होता. याचा संशयातून त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचला.
गजानन आढाव हा एका महिन्याची सुटी घेवून हसनाबाद गावात २७ डिसेंबरला राहण्यास गेला. ट्रॅक्टर चालक योगेश मोरे (रा. नांजा) याला कविताचा खून करण्याच्या उद्देशाने अपघात घडवून आणण्यासाठी त्याने एक लाख रुपये देण्याची बोलणी केली. त्यानंतर योगेश मोरे याने ट्रॅक्टरचा विमा काढून घेतला. यानंतर कटानुसार ३१ डिसेंबर रोजी कुंभारी ते बेलोरा पाटीवर रात्रीच्यावेळी बोलावले. गजानन आढाव याने कविताला बेलोरा येथे नातेवाईकांकडे जाऊन येऊ, असे म्हणून दुचाकीवर बसविले. काही वेळातच दुचाकीचा अपघातात घडवून आणला. अपघातात कविता यांचा जागीच मृत्यू झाला.
कविता यांच्या भावाने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांसमोर व्यक्त केला. या तक्रारीवरून पती गजानन आढाव व ट्रॅक्टर चालक योगेश मोरे यांच्या विरुध्द खूनाचा तसेच कविताच्या सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन व योगेश यांची पेालिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही खून केल्याची कबूली दिली.
हेही वाचा :