बारामती : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होतील : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विश्वास | पुढारी

बारामती : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होतील : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विश्वास

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेसाठी शासनाने 19 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील 9 शहरांमध्ये 39 प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

क्रीडा व युवकचे सह संचालक चंद्रकांत कांबळे, उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा क्रीडाअधिकारी महादेव कसगावडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामतीत येथे कबड्डी स्पर्धा होत असल्याने शहरासह तालुक्यात क्रीडामय वातावरण होण्यास मदत झाली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सामावून घेतले जात आहे. राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच चालना मिळून चांगले खेळाडू तयार होतील.

देशी खेळांची लोकप्रियता वाढली पाहिजे. अपयशी होणार्‍या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. मैदानावरील पुरुष गटातील मुंबई शहर, ठाणे, वाशिम, तर महिला गटातील पुणे जिल्हा, अमरावती व रायगड या संघाना पवार यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली.

Back to top button