देगलूर (गडचिरोली) : पुढारी वृत्तसेवा : IPS Somay Munde : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्ती-कोटगुल जो छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला आहे. तेथुन बाहेर संपर्क करणे ही कठीण आहे. अशा परीसरात सी 60 तुकडीचे पोलिस जवान आणि नक्षलवाद्यांची चकमक उडाली. 10 तासाहून अधिक वेळ चाललेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी 60 तुकडीला यश आले. देशातील सर्वात मोठी कारवाई समजल्या जाणार्या या ऑपरेशनचे नेतृत्व देगलूरचे रहिवाशी असलेले 31 वर्षीय अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अतिशय धाडसाने व संयमाने यशस्वी करून दाखवले. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली असून देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
सोमय यांचे आई व वडील अंबाजोगाई तालुक्यातील आपले मूळ गाव सोडून गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी स्थायिक झाले. त्यामुळे सोमय मुंडे यांचा जन्म देगलूर शहरात झाला. सोमवंशी प्राथमिक शिक्षण शहरातील साधना हायस्कूल देगलूर येथे झाले. त्यानंतर सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये सहावी व सातवी पर्यंत शिक्षण घेऊन ते देहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये गेले. तेथे त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतरचे उच्च माध्यमिक शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केल्यानंतर पवई येथे त्यांनी आयआयटीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र लहानपणापासूनच सोमाय मुंडे यांना सैनिकी, मिल्ट्री स्कूलमधून देशसेवा व धाडसी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याने त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून धाडसी व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगले. सन 2016 साली युपीएससी उत्तीर्ण करून औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात इंचार्ज पोलिस निरीक्षक पदी रुजू होऊन त्याठिकाणी तीन महिन्यात रेती माफियांना वठणीवर आणले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुस्ती येथे डीएसपी म्हणून ते रूजू झाले. तेथे गुटका माफियांना त्यांनी वठवणीवर आणले. हिंदू-मुस्लिम दंगे रोखून सलोखा निर्माण केला. तर कोरना काळात काम नसलेल्या तरुण वेठबिगार, चोरी व अवैध धंदे करणार्यांचे पुनर्वसनही त्यांनी केले.
9 महिन्यांपूर्वी सोमय मुंडे यांनी स्वतःहून नक्षलवाद्यांचा गड मानला जाणारा गडचिरोली जिल्हा निवडला आणि त्याठिकाणी अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदाचे सूत्रे हाती घेतली. तेथे त्यांनी पहिली कारवाई अबुजमाड या घनदाट जंगल परिसरात केली. या कारवाईत त्यांनी नक्षलवाद्यांचे शस्त्रनिर्मितीचे कारखाने नष्ट केले. त्यानंतर दुसर्या नक्षलवादी कारवाईत तेरा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे नक्षलवाद्यांचा थरकाप उडाला. तर नुकत्याच झालेल्या कारवाईत सी 60 जवानांच्या तुकडीचे सोमय मुंडे यांनी नेतृत्व करत २६ लक्षवाद्यांना ठार केले.
या कारवाईसाठी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी धाडसाने धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्ती-कोटगुल येथील चकमकीत 1 कोटी 32 लाखाचे बक्षीस असलेल्या 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत नक्षलवाद्यांचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे ज्याच्यावर 50 लाखाचे बक्षीस होते त्यालाही ठार करण्यात यश आले. या कारवाईमुळे संपुर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली गेली आहे.
सोमय यांनी लहानपणापासूनच सैनिकी आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमधून मिळालेल्या पोलिस अधिकार्यांच्या शिक्षण आणि प्रेरणेतून देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगले. त्यामुळे त्यांनी आयआयटी क्षेत्र सोडून युपीएससी उत्तीर्ण करून पोलीस अधिकारीच्या रूपाने देश सेवा करण्याचे ठरवले. त्याचेच फळ म्हणून आज या नक्षलवाद्यांच्या धाडसी कारवाईत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाने सोमयला मोठे यश प्राप्त करता आले. त्याच्या आई-वडिलांच्या रूपाने अत्यंत आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो.
डॉ. विनायक मुंडे (पोलिस अधिकारी सोमय मुंडे यांचे वडील)