वसमत ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्टलसह दोघांना ताब्यात घेतले.  pudhari photo
हिंगोली

Hingoli Crime : पळसगाव शिवारात तरुणाकडून पिस्टल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

वसमत ः वसमत ते मालेगाव मार्गावर पळसगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाच्या संशयावरून केलेल्या तपासणीमध्ये गावठी पिस्टल आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.

जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिले आहेत. त्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, वसमत ते मालेगाव मार्गावर पळसगाव शिवारात एक जण गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पळसगाव शिवार गाठले. पोलिसांनी त्या ठिकाणी थांबलेल्या पवन डाखोरे (रा. पळसगाव) याची चौकशी सुरु केली. मात्र चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी पिस्टल असल्याचे दिसून आले.

सदर पिस्टल बाबत चौकशी केल्यानंतर त्याने वसमत येथील गणेश गुंडाळे (रा. पांढरी ता. पुर्णा, ह. मु. वसमत) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी गणेश याच्या घरावर छापा टाकून त्यालाही ताब्यात घेतले.

  • या प्रकरणी जमादार पोकळे यांच्या तक्रारीवरून पवन डाखोरे, गणेश गुंडाळे याच्या विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT