वसमत : शहरातील एका भागात घरात शिरलेल्या चौघांनी एका कुटुंबातील व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन व घरातील रोख ९ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन बंदुकीचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे वसमत शहरात घडली.
या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता घटनास्थळी बंदूक मिळून आली. मात्र जप्त केलेली बंदूक छऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले.
शहरातील एक कुटुंब घरात झोपले असताना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चौघांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील एका व्यक्तीचे दोरीने हातपाय बांधले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सहा ग्राम वजनाची सोन्याची चेन काढून घेतली. तसेच त्यांच्या जवळील ९ हजार रुपये हिसकावून घेतले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेली मुलगी बाहेर आली. तिने वडिलांचे हातपाय सोडले. मात्र यावेळी चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून मुलीलाच पळवून नेले.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या मुलीच्या कुटुंबीयांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, जमादार गजानन भोपे, नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्टल सापडले. मात्र सदर पिस्टल छऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्या चौघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर तरुणीच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक डेडवाल यांचे पथकही रवाना केले आहे.