Vasmat Fake Doctors pudhari photo
हिंगोली

Vasmat Fake Doctors : तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा होतोय उघड

पुढारी वृत्तसेवा

भीमराव बोखारे

वसमत : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांतील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस बंगाली डॉक्टर खुलेआम व्यवसाय करत असताना आरोग्य विभाग मात्र झोपा काढत असल्याचा आरोप होत आहे. अकोली व कुरुंदा येथे दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करून विभागाने आपली जबाबदारी झटकली, पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंगाली डॉक्टर असताना फक्त दोनच डॉक्टरांवर कारवाई का असा सवाल उपस्थित होत आहे.

तालुक्यात बोगस डॉक्टर असताना ग्रामपंचायत व गावकरी अशा बोगस डॉक्टरांना का आश्रय देतात, याचे उत्तरही आरोग्य विभागाच्या अपयशातच दडले आहे. वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत ज्या गावांमध्ये बंगाली बोगस डॉक्टर राहतात, त्या गावांमध्ये आरोग्य विभागाची यंत्रणा आरोग्य सेवेसाठी पोहोचतच नाही, हा कडू सत्याचा सवाल आता गावागावातून उपस्थित होत आहे. वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही, औषध नाही, वेळेवर उपचार नाही.

आरोग्य विभागाचे कर्मचारी फक्त लस द्यायला गावामध्ये जातात, एवढेच त्यांचे काम उरले आहे, असा संतप्त आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांना गावात डॉक्टर आले हे सुद्धा माहित होत नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी पाहुणे आल्यासारखे येतात आणि लगेच निघून जातात, अशी अवस्था आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आली तरी गावकऱ्यांना १०-१५ किमी दूर जावे लागते. अशा वेळी गावातच २४ तास उपलब्ध असलेला बंगाली डॉक्टर हाच गावकऱ्यांचा आधार बनतो.

आरोग्य विभाग वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत भागात पोहोचत नसल्याचे हेच निष्पन्न झाले असून यामुळेच गावकरी बंगाली डॉक्टरांना आश्रय देत आहेत. आरोग्य विभाग वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जाऊन आरोग्य सेवा देत नसल्याचा आरोप अनेक गावांमध्ये केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात आरोग्य विभागच दोषी असल्याचे गावकऱ्यांचे ठाम म्हणणे आहे. या बंगाली डॉक्‍टररांकडे दुर्लक्ष का होत आहे असा सवाल उपस्‍थित केला जात आहे.

  • केवळ दोन ठिकाणी कारवाईचा देखावा करून प्रश्न सुटणार नाही, तर वसमत तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये अंतर्गत प्रत्येक गावात नियमित, कायमस्वरूपी आरोग्य सेवा पोहोचवावी, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT