उपजिल्हा रुग्णालय वसमत  pudhari photo
हिंगोली

Vasmat Sub District Hospital : जुन्या रुग्णांच्या चिठ्ठीवरच नवीन रुग्णांची नोंद

वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार, चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वसमत : येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय चिठ्ठ्यांबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या तारखेच्या आणि पूर्वीच्या रुग्णांच्या नावाने वापरलेल्या प्रिस्क्रिप्शन चिठ्ठ्यांवर फुली मारून त्याच चिठ्ठ्यांच्या मागील बाजूस नवीन तारीख व नवीन रुग्णाचे नाव लिहून त्या पुन्हा वापरात आणल्या जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सरकारी रुग्णालयातील नोंदवही व दस्तऐवज व्यवस्थापनातील अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

चिठ्ठ्यांवर १५ जून २०२६ आणि १७ जून २०२६ अशा वेगवेगळ्या तारखांचे शिक्के दिसून येत असून एका बाजूला जुनी माहिती काट मारून रद्द करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन रुग्णाची नोंद करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. वैद्यकीय नोंदींसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा अशा प्रकारे पुनर्वापर करणे नियमबाह्य असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

या प्रकरणाबाबत विचारणा केली असता रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने नवीन कागद उपलब्ध नसल्यामुळे जुन्या चिठ्ठ्यांचा वापर करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती दिली आहे. मात्र, सरकारी रुग्णालयात साध्या प्रिस्क्रिप्शन चिठ्ठ्यांचाही तुटवडा निर्माण होणे हे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करणारे आहे.

रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाशी संबंधित नोंदी अचूक आणि स्वतंत्र असणे आवश्यक असताना, जुन्याच कागदपत्रांचा पुनर्वापर केल्याने भविष्यात वैद्यकीय व प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे रुग्णांच्या नोंदींची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच रुग्णालयातील आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • या प्रकाराची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT