accident file photo
हिंगोली

कंदुरीसाठी नेले जाणारे बकरे उसळले अन् दोघांनी प्राण गमावले

दोन दुचाकींच्या धडकेत दोघे ठार, बकरे उसळल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले,

पुढारी वृत्तसेवा

Two Dead in Two-Wheeler Collision While Transporting Goats for Kanduri Ceremony

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

आरळ ते तेलगाव मार्गावर तेलगाव शिवारात दोन दुचाकींची समोर- समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. एका दुचाकीवरील कंदुरीच्या कार्यक्रमासाठी नेले जाणारे बकरे उसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

या विषयी अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील नांदूसा येथील नितीन नरवाडे व कपील हटकर हे गुरूवारी सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर एक बकरे घेऊन परभणीकडे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन वसमत पासून काही अंतरावर असलेल्या आरळ ते तेलगाव मार्गावर आले असतांना दुचाकीवरील बकऱ्याने अचानक उसळी मारली. यामध्ये दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन दुचाकी वाहन परभणीकडून बऊर (ता. कळमनुरी) कडे जाणाऱ्या दुचाकीवर आदळले.

या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघे जण रस्त्यावर आदळले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, किशोर कौठेकर, किरण धोतरे, प्रितम चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी चौघांनाही तातडीने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातातील नितीन नरवाडे (25 नांदूसा, जि. नांदेड) व शेख सिराज (35 रा. बऊर ता. कळमनुरी) यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. तर कपील हटकर व शेख सिराज यांच्या पत्नीवर उपचार केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मयत नितीन व शेख सिराज यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर गंभीर जखमींवर वसमत येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT