Turmeric crop on 40,000 hectares at risk due to lack of rain
गजानन लोंढे
हिंगोली : मागील काही वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून हिंगोली व वसमत येथील बाजारपेठ नावारूपास येत आहे. यंदा तब्बल ४० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. परंतू, गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने हळद पिकाची परिस्थिती नाजूक बनली आहे. पावसात मोठा खंड पडल्याने हळदीची वाढ खुंटली आहे. परिणामी, भविष्यात हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भिती व्यक्त होत आहे.
सांगलीनंतर हळद लागवडीचे क्षेत्र हिंगोलीत प्रामुख्याने वाढले आहे. त्याखालोखाल नांदेड, परभणी व वाशिम जिल्ह्यात देखील हळदीच्या लागवड क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. हळदीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील बाजारपेठेत हळदीची उलाढाल वाढली आहे सध्या हळदीला सरासरी १५ ते १८ हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. अजूनही हळदीच्या दरात तेजी कायम आहे. गेल्या तीन वर्षापासून हळदीला सरासरी १५ हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने कपाशी, सोयाबीन, केळीला पर्यायी पिक म्हणून हळद लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत.
यंदा जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. परंतू, यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पाऊस कमी झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात काही प्रमाणात पाणी झाल्यानंतर पावसामध्ये सातत्याने खंड पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४८७ मि. मी. पावसाची नोंद झाली. यंदा वार्षिक सरासरीच्या ७५ टक्केच पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
मागील पंधरवाड्यापासून पाऊस गायब झाल्याने ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे ते शेतकरी ठिबकद्वारे आपले हळदीचे पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही किंवा त्यांच्या विहीर अथवा बोअरला पाणीच आले नाही त्या शेतकऱ्यांच्या हळदीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. हळदीसाठी एकरी जवळपास दिड लाखापर्यंत खर्च येतो. शेतकरी हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने मोठा खर्च करीत आहेत.
दरात तेजी राहणार
सध्या येथील बाजारपेठेत हळदीची आवक मंदावली आहे. परिणामी, हळदीचे भाव स्थिर आहेत. सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने खंड दिल्यास हळदीच्या उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या दरापेक्षा पुढील हंगामात हळदीच्या दरात तेजी राहिल असा प्राथमिक अंदाज हळद व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.