Hingoli Crime | जामगव्हाण पाटीजवळ अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह!

उजवा हात नसल्याने घातपाताचा संशय; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Hingoli Crime | जामगव्हाण पाटीजवळ अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह!
Pudhari File Photo
Published on
Updated on

आखाडा बाळापूर : नांदेड–हिंगोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लगत जामगव्हाण पाटीजवळ, भवानी मंदिर परिसरातील निर्जन व खोलगट भागात एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी (६ सप्टेंबर) आढळून आला. मृतदेहाचा उजवा हात नसल्याने या घटनेबाबत संशय निर्माण झाला असून, घातपाताची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

जामगव्हाण पाटीजवळील परिसरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर जामगव्हाण येथील पोलीस पाटलांनी याबाबत आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाच्या अंगावर काळ्या रंगाचे टी-शर्ट व बरमोडा असल्याचे आढळून आले. मृतदेह चार ते पाच दिवसांपासून त्या ठिकाणी असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे संतोष नागरगोजे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन भोसले यांच्यासह डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली. मात्र, मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी अज्ञात मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला असून, मृतदेहाची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news