हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौकात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या एका अनोळखी इसमास वाहतूक पोलिसांनी वेळीच औषधोपचारासाठी दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी गस्त घातली जात आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेेचे निरीक्षक शरद मरे यांनी बंदोबस्ताचे व गस्तीचे नियोजन केले आहे. त्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक रावसाहेब घुमनर, जमादार गजानन राठोड, संतोष घुगे, सुखदेव जाधव, नंदकिशोर महाजन, विद्या भुजबळे यांचे पथक गस्तीवर होते. त्यांचे पथक महात्मा गांधी चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी एक अनोळखी इसम बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला याशिवाय तेथे बघ्यांची गर्दी झाली होती.
पोलिसांनी तातडीने त्या इसमास उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तातडीने औषधोपचार सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी त्या इसमाची ओळख पटविण्यासाठी माहिती घेण्यास सुरवात केली असता त्या इसमाचे नांव मधुकर राठोड (रा. चिंचोली) असे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. सध्या मधुकर यांच्यावर औषधोपचार सुरू असून त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर वेळेत औषधोपचार मिळाल्याने आता त्यांची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या सतर्कतेने मधुकर यांना जीवदान मिळाले असून त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस दलाचे आभार व्यक्त केले तर पोलिस अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल कौतूक केले.