The house of a farmer who went for spraying in the field was broken and stolen
सेनगाव, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील जयपूर येथे शेतात फवारणीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज पळविल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जयपूर येथे गीता पायघन यांचे घर असून घराच्या बाजूलाच काही अंतरावर शेती आहे. शेतामध्ये सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली आहेत. नेहमी प्रमाणे गीता ह्या कुटुंबासह शुक्रवारी सकाळी शेतात गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा सोयाबीन पिकावर फवारणीसाठी आला होता. दुपारी घरी कोणीही नव्हते.
दरम्यान, घरी कोणीही नसल्याचा गैरफायद घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील साहित्याची नासधूस करून साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर घरात ठेव-लेले सात ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस, सात ग्राम वजनाची सोन्याची गहू मन्याची पोथ, तीन ग्राम वजनाचे सोन्याचे झुमके, अर्धा ग्राम वजनाची सोन्याची नथ, लहान मुलांच्या हातातील व पायातील २ चांदीचे कडे असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोवारा केला.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पायघन कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर घरातील साहित्याची नासधूस झालेली दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरातील दागिने शोधले असता दागिने व २० हजार रुपये रोख गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सेनगाव पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार जाधव, किशोर कातकडे, मारकळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जमादार जाधव पुढील तपास करीत आहेत.