

वसमत : उसने दिलेले अवघे एक हजार रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाने मित्राच्या पोटात चाकू खुपसून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चंदगव्हाण येथे घडली आहे. मंगळवारी (दि.७) रात्री घडलेल्या या घटनेत शेख इर्शाद शेख दाऊद हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी तरुणावर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील चंदगव्हाण येथील रहिवासी शेख इर्शाद शेख दाऊद याने काही दिवसांपूर्वी वसमत शहरातील दर्गा मोहल्ला येथे राहणाऱ्या शेख आसीम याला एक हजार रुपये उसने दिले होते. शेख इर्शाद आपले पैसे परत मागत असताना आरोपी शेख आसीम सातत्याने टाळाटाळ करत होता.
मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी शेख आसीम हा चंदगव्हाण येथे आला होता. यावेळी शेख इर्शादने त्याला पुन्हा एकदा पैसे परत करण्याची विनंती केली. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वादाचे रूपांतर भीषण हल्ल्यात झाले. काही कळण्याच्या आतच संतप्त झालेल्या शेख आसीमने आपल्याजवळील चाकू काढून शेख इर्शादच्या पोटात भोसकला आणि घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने शेख इर्शाद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याने मदतीसाठी आरडाओरड करताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी शेख इर्शादला वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम गंभीर असल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. सध्या त्याच्यावर नांदेडमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक जी. जी. डक आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी जखमी तरुणाचे वडील मौलाना शेख दाऊद यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख आसीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.