कालव्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला File photo
हिंगोली

कालव्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला

वडद शिवारात लागला शोध

पुढारी वृत्तसेवा

The body of the young man who went missing in the canal was found after 4 days

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा :

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधाशोधनंतर रविवारी (दि. १८) सापडला. घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर वडद शिवारात हा मृतदेह आढळून आला. दीपक काळे (वय २८, रा. जवळा बाजार) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

दीपक काळे हे बुधवारी (दि. १४) सायंकाळी जवळा बाजार शिवारातील कालव्यात पडले होते. माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, कालव्यात पाण्याचा प्रवाह आणि पातळी जास्त असल्याने मृतदेह शोधण्यात मोठे अडथळे येत होते.

पाटबंधारे विभागाला सांगूनही पाणी कमी होत नसल्याने, दीपक यांचा मृतदेह शोधण्यासाठी पाणी बंद करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी जवळा बाजार येथे आणि नंतर थेट महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन केले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे आणि उपनिरीक्षक कैलास भगत यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. पोलिस आणि गावकऱ्यांनी कालव्यात सलग शोधमोहीम राबवली. रविवारी सकाळी घटनास्थळापासून चार किलोमीटर अंतरावर वडद शिवारातील कालव्यात दीपक यांचा मृतदेह आढळून आला.

घातपाताचा संशय

मयत दीपक यांचा घातपात करून मृतदेह कालव्यात टाकल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपाची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT