

आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने सोमवारी (दि.१९ जानेवारी) पहाटे 4 वाजता छापा टाकून तीन वाहनांसह 24.67 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्हयात अवैध व्यवसायासोबतच गुटखा विक्री, अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकासह नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.
या पथकाकडून अवैध व्यवासायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहे. या शिवाय नागरीकांनीही माहिती द्यावी यासाठी खबर हि संकल्पना देखील हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात तीन वाहनांमधून गुटखा आणून तो आखाडा बाळापूर व परिसरात पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ तलदेवार, जमादार प्रदीप खानसोळे, संजीव जिंतकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वारंगाफाटा शिवारात पाहणी केली. यावेळी एका काँम्प्लेक्स जवळ दोन पीकअप व एक महिंद्रा टीयूव्ही वाहन उभे असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या दोघांची चौकशी सुरु केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली. वाहनातील पोत्यांमध्ये राजनिवास, विमल, मुसाफीर, जाफराणी दर्जा नावाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तीन वाहनांसह गुटख्याची पोती असा 24.67 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरमी करण अवचार, प्रभाकर अवचार (रा. भोसी, ता. कळमनुरी) यांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.