Hingoli News : वीस वर्षांत आठ हजार सापांना दिले जीवदान  File Photo
हिंगोली

Hingoli News : वीस वर्षांत आठ हजार सापांना दिले जीवदान, सोनटक्के कुटुंबीयांची कामगिरी

शाळांमधूनही जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

Sontakke family has given life to nearly 8 thousand snakes in the last twenty years.

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोहगाव येथील सोनटक्के कुटुंबीयांनी मागील वीस वर्षात तब्बल ८ हजार सापांना जीवदान दिले आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या कुटुंबाकडून शाळांमध्ये तसेच शेतकऱ्यांसोबत कार्यक्रमही घेतले जात आहेत.

साप दिसल्यानंतर तो विषारी आहे किंवा नाही याची माहिती न घेताच त्याला मारण्यासाठी धावले जाते. शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातूनही हिच परिस्थिती आहे. शेतात असलेला साप देखील मारला जातो. मात्र साप हा शेतकऱ्यांचा शत्रु नव्हे तर मित्र आहे वन विभागाकडून समजावून सांगितले जात असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

मात्र हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील अरिंजय सोनटक्के त्यांच्या पत्नी सुनीता सोनटक्के मुले विश्वजीत अन अभिजीत साप वाचविण्यासाठी जनजागृती करीत आहेत. अरिंजय सोनटक्के हे मागील ३० वर्षापासून साप पकडतात. त्यानंतर त्यांची पत्नी सुनीता सोनटक्के यांनाही त्यांनी सापाची माहिती देऊन साप कसा पकडायचा याचे धडे दिले.

पुढे सुनीता यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना साप पकडण्याचे कसब शिकविले आहे. हिंगोली तालुक्यात आजही साप निघाल्यानंतर सर्वप्रथम अरिंजय व सुनीता सोनटक्के यांचे नाव घेतले जाते. तर साप निघाल्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.

या कुटुंबाने मागील वीस वर्षात सुमारे ८ हजार सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या कुटुंबाने शाळा, महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सापा विषयी अस-लेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न चालविले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

सध्या त्यांची दोन्ही मुले छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असून त्या ठिकाणीही कोणी साप निघाल्याची माहिती दिल्यास हातचे काम सोडून ते साप पकडण्यासाठी धावतात. विशेष म्हणजे साप पकडण्यामध्ये सुनीता सोनटक्के यांचा हातखंडा आहे. त्यांचे साप पकडण्याचे कसब पाहून गावकरीही त्यांचे कौतूक करून पाठीवर शाबासकीची थाप देतात.

सापामध्ये फुरसे, मन्यार, घोणस, नाग या जाती विषारी आहेत तर इतर बहुतांश जाती बिनविषारी आहेत. त्यामुळे साप निघाल्यानंतर घाबरून न जाता आधी तो विषारी आहे किंवा नाही हे समजून घेतले पाहिजे. त्यानंतर तातडीने सर्पमित्राला बोलवावे. सापाला विनाकारण मारू नये. तर सापाबाबत असलेले गैरसमज दूर होणे आवश्यक आहे, अशी भावना सुनीता सोनटक्के यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT