

हिंगोली ः हिंगोली लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाल्यानंतर त्यांचा हिंगोली जिल्ह्यात संपर्क कमी झाला आहे. याची चर्चेचा असतानाच रविवारी पार पडलेल्या खासदार आष्टीकर यांच्या वाढदिवसाला थेट भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शुभेच्छा दिल्याने खासदार आष्टीकर समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. आष्टीकर हे भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना अशी शंका देखील उपस्थित होऊ लागली आहे.
अमित शहा यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण त्याच सोबत आपुलकीने हा कितवा वाढदिवस साजरा करत आहात असेही त्यांनी विचारले. यावर आपण 54 वा वाढदिवस साजरा करत असल्याचे नागेश पाटील यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते, तर कधी गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.
त्यात आता अमित शहा यांनी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने भाजपने पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू केले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आले. या निवडणुकीत आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा दारुण पराभव केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने मात्र आघाडीचा चांगलाच पराभव केल्याचे पाहायला मिळाले. खासदार आष्टीकर यांना केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या शुभेच्छा आल्याची माहिती समाजमाध्यमांवर झपाट्याने पसरली. परिणामी, हिंगोलीतील ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. एकीकडे मागील वर्षभरापासून काही मोजक्याच पदाधिकार्यांच्या संपर्कात असलेले खासदार आष्टीकर आता तर चक्क भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्याने खासदार आष्टीकर हे ठाकरे सेनेत काही दिवसाचे पाहुणे असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. एकूणच आष्टीकरांनी कितीही ठाकरे निष्ठा दाखविली तरी राज्यातील राजकीय घडामोडी पाहता त्यांच्याबाबत निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
खासदार नागेश पाटील यांना अमित शहा यांचा शुभेच्छांचा फोन आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आष्टीकर यांना शुभेच्छा देताना साथ कायम ठेवा असे आवाहन केले. यावर साहेब ही काही सांगायची गोष्ट आहे का ? तुमचा आशिर्वाद कायम असू द्या असे म्हणत आष्टीकर यांनी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला. यावर नाही, मी तुम्हाला तुम जिओ हजारो साल अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आमची साथ देखील हजारो वर्ष द्यावी लागेल, सोबत रहावे लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.