

4.53 MW solar power generation from Surya Ghar scheme
वसमत, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत व पर्यावणपुरक उर्जेच्या दिशेने वाटचाल करत जिल्ह्यात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत विज योजनेअंतर्गत तब्बल १ हजार २७७ घरांच्या छतांवर सौरउर्जेची निर्मिती केली जात आहे. यातून जवळपास ४.५३ मेगावॅट सौरउर्जेची निर्मिती केली जात आहे. यामुळे घरगुती विज खर्चात बचत होत असून अतिरिक्त विज महावितरणला विकता येणार आहे.
सौरउर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना अनुदानावर आधारित आहे. जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात ११.२३ मेगावॅट इतकी विजनिर्मिती करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सौरउर्जेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्र शासनाकडून एक कोटी रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. महावितरणने नागरीकांना आवाहन केले की, विजप रवठा खंडीत झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास कोणीही स्वतःहून दुरूस्तीचे काम करू नये, अशा बाबींची महिती तात्काळ महावितरण कार्यालयास द्यावी. दुरूस्तीची कामे अधिकृत यंत्रणेकडून करावीत, असे स्पष्ट करण्यात आले.
विजेची बचत होते बिल वाचते, अतिरिक्त वीज सरकारी ग्रीडला विकून उत्पन्नाचा स्त्रोत तयार होतो. सौरउर्जा ही स्वच्छ व नवीकरणीय असल्याने प्रदुषण होत नाही. एकदा सौर पॅनल बसवले की देखभाल फारशी लागत नाही. वीज कपातीच्या वेळी स्वतःची वीज उपलब्ध असल्याने स्वतंत्रता मिळते. सौर पॅनलसाठी सरकारकडून अनुदान किंवा सबसिडी मिळते असे महावितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
एक किलोवॅट सौर पॅनलसाठी ३० हजार रूपये, दोन किलोवॉट सौर पॅनलसाठी ६० हजार रूपये, तीन किलोवॉट व त्यापुढील क्षमतेसाठी ७८ हजार रूपये अनुदान मिळते. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात सौर ग्राम दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून जनजागृती करत नागरीकांना सौरउर्जेच्या वापरास अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणासोबत आर्थिक बचतीसाठी उपयक्त ठरत असून, जिल्हा सौरउर्जेच्या क्षेत्रात पुढाकार घेत आहे.