Son-in-law murdered by father-in-law in Hingoli
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीस नांदण्यास पाठवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासरा अन् मेहुण्याने जावयाला दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१९) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
तालुक्यातील भटसावंगी येथील हरिदास चवरे (३३) याचा विवाह सात वर्षांपूर्वी गावातीलच वर्षा कपाटे यांच्या सोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगीही झाली. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाला होता. सततच्या वादाला कंटाळून वर्षा या आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांच्या माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे हरिदास हे एकटेच घरी होते. दरम्यान, हरिदास हे बुधवारी दुपारच्या सुमारास घरासमोर उभे होते. यावेळी त्यांचे सासरेसाहेबराव कपाटे व मेहुणा गोलू ऊर्फ शत्रुघ्न कपाटे यांच्यात बोलणी सुरू होती.
तुम्ही वर्षाला नांदण्यास का पाठवत नाही या कारणावरून त्यांच्यात वादाला तोंड फुटले. शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेला अन् हाणामारीला सुरुवात झाली. यामध्ये साहेबराव व गोलू याने हरिदास यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने वार करून गंभीर जखमी केले. यामध्येच हरिदास यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोघेही पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, उपनिरीक्षक मदन गव्हाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत हरिदास यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार कैलास गुंजकर, नामदेव हाके यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केली. पोलिसांनी दोघांचीही माहिती घेऊन त्यांना यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी दत्ता चवरे यांच्या तक्रारीवरून साहेबराव कपाटे, गोलू कपाटे यांच्याविरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे पुढील तपास करीत आहेत.