

Three municipal elections in Hingoli district
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तीन पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगर-सेवकपदासाठी बंड केलेल्या इच्छुक बंडोबांना थंड करून त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तूर्तास अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा पक्षीय उमेदवारांसोबतच अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वसमतमध्ये तर शिंदे सेनेच्या उमेदवाराला भाजपत प्रवेश देऊन त्यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर हिंगोलीत एका प्रभागात भाजपच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या एका इच्छुक महिला उमेदवाराला ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. दरम्यान, तिन्ही पालिकेसाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वसमतमध्ये उपविभागीय अधिकारी विकास माने, कळमनुरीत तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्जाची छाननी झाली. या छाननीमध्ये काही ठिकाणी विर-ोधी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेपही घेण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निकाल दिले.
दरम्यान, आता हिंगोली पालिकेच्या नगरसेवक पदाच्या ३४ जागांसाठी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १७९ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. तर कळमनुरीत २० जागांसाठी नगराध्यक्षपदासाठी १४ तर नगरसेवक पदासाठी ११५ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वसमतमध्ये ३० जागांसाठी नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवक पदासाठी १८० पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे.
आपापल्या प्रभागात अपक्ष व पक्षीय बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी बंडखोर व अपक्षांची मनधरणी सुरू झाली असून त्यासाठी साम, दामचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र तूर्तास अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आता खऱ्या आर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.